(Education) शाळा सोडल्याच्या दाखल्यावर धर्माचा उल्लेख टाळा; पिंपरी चिंचवड मनपाचे मुख्याध्यापकांना आदेश

पिंपरी | प्रतिनिधी

(Education) आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर (LC) जात नमूद करताना त्यापुढे धर्माचा उल्लेख केल्यास असा दाखला जात पडताळणीसाठी अवैध ठरण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या शिक्षण विभागाने शहरातील सर्व शाळांना कडक सूचना दिल्या आहेत. दाखल्यांवर केवळ ‘जमातीचा’ उल्लेख करावा आणि धर्माचा उल्लेख टाळावा, असे आदेश प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिले आहेत.

(Education) अनेक शाळांमध्ये अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे दाखले देताना ‘हिंदू-भिल्ल’, ‘हिंदू-ठाकूर’, ‘हिंदू-कोळी महादेव’ असा उल्लेख केला जातो. मात्र, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या १२ जानेवारी २००० रोजीच्या परिपत्रकानुसार, अशा प्रकारे धर्माचा उल्लेख करून दिलेले जातीचे दाखले वैध मानले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात जात पडताळणी (Caste Validity) प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

(Education) महापालिकेच्या शिक्षण विभागाने (प्राथमिक) यासंदर्भात स्वतंत्र परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे की, शहरातील सर्व मनपा, खासगी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शासन निर्णयाचे काटेकोर पालन करावे.

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर नोंदी करताना शासन परिपत्रक क्र. एसटीसी-१०९९/प्र.क्र.३१/का-१० नुसारच कार्यवाही करावी, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जात व जमातीच्या नोंदी अचूक ठेवाव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळवताना होणारा त्रास कमी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिकेच्या या भूमिकेचे अनुसूचित जमाती शिक्षक कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *