कोल्हापूर | २०.२ |प्रतिनिधी
येथील कसबा बावडामधे असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी अखेर ऐतिहासिक ‘शाहू संग्रहालय’ साकार झाले असून, महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शनिवारी ता. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:०० वाजता या संग्रहालयाचे लोकार्पण होणार आहे.
याविषयी माहिती देताना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कसबा बावडा येथील ‘बावडा बंगला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी झाला होता. आपल्या जन्मस्थळाबद्दल शाहू महाराजांना विशेष अभिमान होता. त्यांनी हे जन्मस्थळ आपल्या जनक घराण्याकडून करवीर छत्रपतींकडे घेतले होते. ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला, त्या ठिकाणी संगमरवरी पाटी लावण्याचाही आदेश त्यांनी दिला होता. त्यांच्या निधनानंतर या वास्तूचे नामकरण ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ असे करण्यात आले.
सावंत पुढे म्हणाले, करवीर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत हा पॅलेस छत्रपतींचे निवासस्थान म्हणून वापरला जात होता. स्वातंत्र्यानंतर या वास्तूचे रूपांतर शासकीय विश्रामगृहात झाले. १९७४ मध्ये शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे जन्मस्थळ राज्य सुरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, येथे दर्जेदार संग्रहालय उभारणीची मागणी अनेक वर्षे प्रलंबित राहिली.
२००८ साली या जन्मस्थळाला भेट दिल्यावर मुख्य जन्मखोलीची झालेली दयनीय अवस्था पाहून अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी संवर्धनासाठी पुढाकार घेतला. वसंतराव मुळीक, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव आणि डॉ. वसंतराव मोरे यांसारख्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गेली १९ वर्षे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
या कालावधीत संग्रहालय उभारणीसाठी आवश्यक छायाचित्रे, कागदपत्रे आणि अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, शाहू महाराजांचे जीवनचरित्र लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना समजेल अशा स्वरूपात येथे मांडण्यात आले आहे.
इंद्रजित सावंत यांनी महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील सर्व शाहू अभ्यासक आणि शाहूप्रेमींना या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संग्रहालय पाहून आवश्यक सूचना देण्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समतेच्या कार्याची गाथा सांगणारे हे संग्रहालय कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



