संगमनेर | २२.२ | नितीनचंद्र भालेराव
(Agriculture) रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीचा पोत ढासळत असताना आणि त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर जाणवत असताना, संगमनेरच्या एका युवा संशोधकाने शेतीसाठी अभिनव उपाय सुचवला आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सुपुत्र डॉ. प्रणव प्रमोद पावसे यांच्या पीएच.डी. संशोधनाला National Bank for Agriculture and Rural Development (नाबार्ड) कडून २०२३ सालचा ‘उत्कृष्ट डॉक्टरेट प्रबंध’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
(Agriculture) पारंपरिक शेती पद्धतीत पिकांना सरसकट खत टाकले जाते. यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते आणि उत्पादन खर्चही वाढतो. या पार्श्वभूमीवर डॉ. पावसे यांनी विकसित केलेले ‘ट्रॅक्टर चलित सेन्सर आधारित यंत्र’ कृषी यांत्रिकीकरणातील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हे यंत्र जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि पिकांची गरज सेन्सरद्वारे तपासते व आवश्यक त्या ठिकाणीच नियंत्रित प्रमाणात खताची मात्रा सोडते.
(Agriculture) या तंत्रज्ञानामुळे खतांच्या वापरात थेट ३० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण कमी होऊन रासायनिक साखळीमुळे उद्भवणाऱ्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासही हातभार लागणार आहे.
डॉ. पावसे यांनी हे संशोधन Mahatma Phule Krishi Vidyapeeth (राहुरी) येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. या कार्याबद्दल त्यांना नाबार्डतर्फे एक लाख रुपये रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.
‘क्लायमेट स्मार्ट ॲग्रीकल्चर’ संकल्पनेला बळ देणाऱ्या या संशोधनामुळे डॉ. पावसे यांच्या नावावर १ पेटंट, १ कॉपीराईट आणि २५ संशोधन लेख नोंदवले गेले आहेत.
या राष्ट्रीय यशाबद्दल माजीमंत्री बाळासाहेब थोरात, खा. भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे तसेच राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आणि हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. ग्रामीण भागातील तरुण संशोधकाने जागतिक दर्जाचे संशोधन करून संगमनेरचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.



