जागतिक विज्ञान दिन विशेष : योगातील वैज्ञानिक आधारावर तज्ज्ञांची मांडणी

अहिल्यानगर | प्रतिनिधी

२८ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘जागतिक विज्ञान दिना’चे औचित्य साधून सावेडी येथील योग विद्याधामच्या वतीने ‘योग व विज्ञान’ या विषयावर अभ्यासपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, ता. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता योग भवन, सावेडी येथे होणार असल्याची माहिती संस्थेच्या कार्याध्यक्षा मीना देशपांडे यांनी दिली.

या परिसंवादात योगशास्त्र, वैद्यकीय शास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांचा परस्परसंबंध उलगडला जाणार आहे. योगाभ्यासाचा मानवी शरीर, मन आणि जीवनशैलीवर होणारा वैज्ञानिक परिणाम विविध अंगांनी मांडला जाणार असून तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून संशोधनाधारित माहिती सादर केली जाईल.

कार्यक्रमात डॉ. ज्योती तनपुरे-चोपडे, डॉ. रवींद्र आंधळे, डॉ. विश्वनाथ काळे तसेच पुनम वच्छतानी हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून त्यामागे सशक्त शास्त्रीय आधार असल्याचे या परिसंवादातून स्पष्ट करण्यात येणार आहे. प्राणायाम, ध्यान आणि आसनांचा शरीरातील जैविक प्रक्रिया, मानसिक ताणतणाव, एकाग्रता आणि रोगप्रतिकारशक्तीवर होणारा परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थी, शिक्षक, योगप्रेमी तसेच नागरिकांनी या ‘योगातील विज्ञान’ विषयावरील परिसंवादास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन योग विद्याधामतर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *