अहिल्यानगर | प्रतिनिधी
जैन धर्मातील २४ तीर्थंकरांपैकी तेविसावे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवान हे ‘पुरुषादानीय’ म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या स्तोत्र-भजनांचे श्रवण व नामस्मरणाने संकट निवारण, मानसिक शांती आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी जैन समाजाची श्रद्धा. प्रभु पार्श्वनाथांचा जन्म कल्याणक महोत्सव रविवार, १४ डिसेंबर रोजी आनंदधाम, अहिल्यानगर येथे उत्साहात साजरा होणार असून त्यासाठी पाच दिवसीय धार्मिक कार्यक्रमांची सुरूवात १२ डिसेंबरपासून झाली आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रसंत आचार्य सम्राट प.पू. श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या शिष्य परंपरेतील महाराष्ट्र प्रवर्तक प.पू. श्री कुंदनऋषिजी म.सा., प्रबुद्ध विचारक प.पू. श्री आदर्शऋषिजी म.सा. आणि संस्कार दिवाकर प.पू. श्री आलोकऋषिजी म.सा. यांसह साधु-साध्वीजींच्या पावन सान्निध्यात दररोज सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत जाप-आराधना व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजकांनी १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत भक्तांसाठी विशिष्ट रंगांचे वस्त्र परिधान करण्याचे आवाहन केले आहे. १२ तारखेला सफेद, १३ ला नेव्ही ब्लू, १४ ला हिरवा व १५ तारखेला स्काय ब्लू ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.
१६ डिसेंबर रोजी आनंद – उज्वल – प्रमोद ग्रुपतर्फे विदुषी साध्वी श्री विरागदर्शनाजी म.सा. यांच्या पाचव्या स्मृति दिनानिमित्त जाप गुणानुवाद सभेतून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, १४ डिसेंबर, रविवार रोजी प्रभु पार्श्वनाथ भगवान जन्म कल्याणक निमित्ताने विशेष जाप साधना, एकासन, आयंबिल, उपवास व तेला तप यांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व श्री जैन तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड, अहिल्यानगर यांनी आबालवृद्धांना एकासन तप करण्याचे आवाहन केले आहे. एकासन आराधकांसाठी भोजन व्यवस्थाही भक्तनिवास येथे करण्यात आली आहे.
श्रध्दाळू श्रावक-श्राविकांनी पाच दिवसीय या आध्यात्मिक महोत्सवाचा सपरिवार लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



