अशोका आर्ट गॅलरीतील सूक्ष्म खडूशिल्पे पाहून मावळे झाले थक्क

अहिल्यानगर | प्रतिनिधी

सावेडी उपनगरातील अशोका आर्ट गॅलरीला नुकतीच शिवशाहीर आचार्य हेमंतराजे मावळे यांनी भेट देऊन खडूशिल्पकलेचे अवलोकन केले. या वेळी त्यांनी व्यक्त केले की, “खडूशिल्पात व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव इतक्या स्पष्टपणे दिसणे हेच एक आश्चर्य आहे. दीड सेंटीमीटरपेक्षा लहान असलेल्या या शिल्पांमध्ये कलाकाराने भावना जिवंत केल्या आहेत.”

मावळे यांनी गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या करारी मुद्रा, तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महात्मा  फुले व सावित्रीबाई फुले, साईबाबा आणि आनंद ऋषीजी यांच्या सूक्ष्म खडूशिल्पांचे मनःपूर्वक कौतुक केले. प्रत्येक व्यक्तिमत्त्वाच्या कार्याशी सुसंगत प्रतीकात्मक आकार खडूवर कोरलेले पाहून त्यांनी कलाकाराच्या कल्पकतेचे अभिनंदन केले.

नेवासा येथील ‘पैस खांब’ आणि त्या छोट्या शिल्पाच्या खाली कोरलेले संपूर्ण ‘पसायदान’ पाहून त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. “कदाचित ही जगातील सर्वात लहान व्यक्तीशिल्पे असावीत,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

नगरमधील निसर्गचित्रे, छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र तसेच विविध व्यक्तिचित्रांचेही त्यांनी निरीक्षण करून कलाकाराच्या कौशल्याचे मनापासून कौतुक केले.

यावेळी गॅलरी संचालिका हर्षदा डोळसे यांनी शिवशाहीर मावळे यांचे स्वागत केले, तर अशोक डोळसे यांनी खडूशिल्पावरील पुस्तक व मावळे यांचे पेन्सिल स्केच भेट देऊन सन्मान केला. इंटेरियर डिझायनर श्रद्धा डोळसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या प्रसंगी मावळे यांनी आपल्या कुटुंबासह गॅलरीला भेट दिली. त्यांनी सांगितले की, “या अनोख्या खडूशिल्पकलेचा अनुभव म्हणजे डोळ्यांना आणि मनालाही आनंद देणारा आहे. इतक्या सूक्ष्म पातळीवर व्यक्तिमत्त्वाचे भाव साकारलेली कलादुर्मिळच आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *