अहिल्यानगर तालुका | प्रतिनिधी
माथणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी मंजुश्री घोरपडे हिला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा ‘वीरगाथा’ राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी, लष्करप्रमुख जनरल अनिल चौहान, नौदलप्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी, हवाईदलप्रमुख अमरप्रीत सिंग, संरक्षण सचिव डॉ. समीर कामंत, शिक्षण सचिव संजय कुमार तसेच आर्थिक सल्लागार राजकुमार अरोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंजुश्रीची मार्गदर्शक शिक्षक सुनील अडसूळ हेही उपस्थित होते.
या उपक्रमासाठी संगमनेर डायटच्या नोडल अधिकारी ज्योती निंबाळकर यांनी वेळोवेळी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून १ कोटी ९२ लाख ४८ हजार ९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील निवडक विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणूनही निवड करण्यात आली होती.
मंजुश्रीला शिक्षक सुनील अडसूळ व राहुल व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले होते. या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, संगमनेर डायटचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर, जिल्हा नोडल अधिकारी ज्योती निंबाळकर, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, केंद्रप्रमुख संजय धामणे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ, सरपंच विलासराव घोरपडे, उपसरपंच अशोक कांडेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर घोरपडे, ग्रामस्थ व पालकांनी मंजुश्री व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये भारत सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या ‘वीरगाथा ५.०’ या राष्ट्रीय स्पर्धेत मंजुश्री घोरपडे हिची देशपातळीवरील ‘सुपर १००’ विजेत्यांमध्ये निवड झाली होती. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.



