जैन सोशल फेडरेशनच्या महावीर भवनात दिवाळी फराळ महोत्सवाची धमाल सुरुवात ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर स्वादिष्ट फराळ विक्री; १२ वर्षांची सामाजिक सेवेतली गोड परंपरा

अहिल्यानगर | जैनवार्ता

जैन सोशल फेडरेशन संचलित भगवान महावीर भवनात सलग १२ व्या वर्षी दिवाळी फराळ महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. सर्वसामान्यांच्या दिवाळीला गोडवा आणि आनंदाचा स्पर्श मिळावा, या हेतूने सुरू झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन नागपूरचे नामवंत उद्योजक उमेश पगारिया यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पोपटलाल सुराणा, बसंतीलाल गोलेचा (नागपूर), केसरीमल छाजेड, संतोष बोथरा, सतीश बोथरा, सतीश लोढा, मिलापचंद पटवा, अमित पटवा, रुपेश पटवा, प्रकाश पटवा, डॉ. अशोक महाडिक (आनंदऋषीजी नेत्रालय) गिरीश गांधी, तुषार मुनोत, आर्यन पटवा, अर्पित पटवा आदी मान्यवर उपस्थित होते.

मिलापचंद पटवा यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, “घरगुती दर्जाचा, हायजेनिक आणि स्वादिष्ट फराळ सर्वसामान्यांना सहज मिळावा, या हेतूने ही संकल्पना राबवली आहे. वाढत्या कच्च्या मालाच्या किंमती असूनही आम्ही ना नफा, ना तोटा या तत्त्वावर फराळ विक्री करत आहोत.”

बुंदीचे लाडू, मसाला शेव, चिवडा, शंकरपाळे, सोनपापडी यांसारख्या पदार्थांचा दर फक्त १५० रुपये प्रति किलो इतका ठेवण्यात आला आहे. नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादच या उपक्रमाला आज १२ वर्षांचा सुवर्ण प्रवास घडवून आणत असल्याचे त्यांनी सांगितले.

संतोष बोथरा म्हणाले, “आचार्यश्री आनंदऋषीजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि आदर्शऋषीजी महाराजांच्या प्रेरणेने सुरू केलेला हा उपक्रम फक्त फराळ विक्री नसून, ती सेवा आणि प्रेमाचा प्रसाद आहे. ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हीच आमची खरी कमाई आहे.”

उद्घाटक उमेश पगारिया म्हणाले, “दिवाळी म्हणजे केवळ दिवे आणि फटाके नव्हे, तर ती प्रेम आणि आपुलकीचा सण आहे. महावीर भवनातील फराळ महोत्सव या सणाला खरी सामाजिक जोड देतो. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सर्वसामान्यांना दर्जेदार फराळ देणे म्हणजे समाजातील मानवी मूल्यांना पोषक अशी खरी सेवा आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात विश्वास, संवेदना आणि मानवतेचा सुगंध पसरतो.”

संपूर्ण फराळ उच्च प्रतीच्या किराण्यापासून आणि स्वच्छ वातावरणात तयार करण्यात आल्याचे अमित पटवा आणि रुपेश पटवा यांनी सांगितले. नगरकरांना दर्जेदार फराळ देण्यासाठी संपूर्ण टीम दिवस-रात्र परिश्रम घेत असून, हा उपक्रम नगरकरांच्या प्रेमामुळे यशस्वीपणे पुढे सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *