जिल्ह्यातील तरुणाईच्या सर्वांगीण विकासाला चालना देत सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि नवोन्मेष जपण्यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार येत्या ३ व ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी दिली.
या महोत्सवादरम्यान सांस्कृतिक वर्गात लोकनृत्य, लोकगीत, कौशल्य विकास विभागात कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व, कविता यांसारख्या विविध स्पर्धा रंगणार आहेत. तसेच नवोपक्रम ट्रॅकमध्ये विज्ञान प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धांमध्ये १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होण्याची संधी उपलब्ध असून वयाची गणना १२ जानेवारी २०२६ रोजीच्या स्थितीनुसार केली जाणार आहे. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असून पुढे विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधीही मिळणार आहे.
युवा महोत्सवासाठी जिल्ह्यातील कृषी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला मंडळे तसेच १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींनी खालील गुगल फॉर्म द्वारे ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. खुरंगे यांनी केले आहे.