जोतिबा समजून घेतले तरच सावित्री होता येईल – प्रा. स्नेहा गायकवाड

अहिल्यानगर | प्रतिनिधी

एक जोतिबा होते, ज्यांनी एक सावित्री घडवली; आणि त्या सावित्रीने अनेक सावित्र्या घडवल्या. आज आपण सावित्रीच्या लेकी म्हणून अभिमान बाळगतो, त्याचे श्रेय फुले दाम्पत्यालाच जाते. आधुनिक काळातही पुरुषांकडून जोतिबांप्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळाले, तर प्रत्येक स्त्रीतील सावित्री बाहेर येईल. फुलेंचा सत्यशोधक विचार हा सत्य वर्तन, सत्य आचरण आणि तत्त्वज्ञानदृष्ट्या समाज घडवणारा आहे. आजच्या बदलत्या सामाजिक वास्तवात फुलेंचे शिक्षण, समानता व न्याय यांचे विचार अधिकच आवश्यक आहेत. त्यामुळे आधी जोतिबा समजून घेतले, तरच सावित्री होता येईल, असे प्रतिपादन प्रा.स्नेहा गायकवाड यांनी केले.

शहरातील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. स्नेहा गायकवाड बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सहसचिव मुकेश मुळे, विश्वस्त जयंत वाघ, विश्वस्त अरुणाताई काळे, निर्मलाताई काटे, अलकाताई जंगले, कल्पनाताई वायकर आदी उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, प्रबंधक बबन साबळे, जयंती सोहळ्याच्या कार्याध्यक्षा प्रा. सविता शेळके, विद्यार्थिनी वसतिगृहाच्या अधिक्षिका डॉ. सुनीता मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. गायकवाड यांनी जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवनक्रम मांडत त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना सत्यशोधक विचार आत्मसात करण्याचे आवाहन करताना ‘कमवा व शिका’ योजना स्वावलंबन घडवणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण रोजगारक्षम नसेल, तर ते केवळ बोलघेवडेपणा ठरते, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. फुले कुटुंबाचा स्वतःचा व्यवसाय असूनही त्यांनी समाजहिताला प्राधान्य दिले; आपणही समाजातील सर्व घटकांबद्दल संवेदनशील राहिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पदापेक्षा माणूस म्हणून आपण कसे आहोत, याचा विचार महत्त्वाचा असल्याचे सांगून महापुरुषांना जातीय चौकटीत न अडकवता त्यांच्या सर्वसमावेशक विचारांकडे पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा देत महिलांना अधिक प्रगतीसाठी प्रेरणा दिली. अरुणाताई काळे, अलकाताई जंगले व कल्पना वायकर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अॅड. दीपलक्ष्मी म्हसे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनकार्यामुळेच आज महिलांना प्रगतीची दिशा मिळाल्याचे नमूद केले.

दरम्यान, महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या प्रांगणात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले तसेच विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांच्या वेशभूषेत सहभाग घेत रॅली काढली. महिला सबलीकरण व सक्षमीकरणाचा संदेश देणारे ‘सावित्री, अजून बरंच काही बाकी आहे’ हे विशेष पथनाट्य सादर करण्यात आले. त्याला उपस्थित मान्यवरांनी विशेष दाद दिली.

जयंतीनिमित्त विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कला-संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरी शहाजी गदादे तर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल साक्षी त्र्यंबक जाधव यांना सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक साक्षी उंदरे, द्वितीय क्रमांक तनुजा सुभाष सोनवणे, तृतीय क्रमांक श्रद्धा प्रकाश कटके तर दिव्यानी कायल पंडित व निधी हिरालाल चेन्नुर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री तोडकरी व प्रा. देवकी ढोकणे यांनी केले. आभार प्रा. सुनीता मोटे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक-प्राध्यापिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *