माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेची दुहेरी कामगिरी; सलग दोन वर्षांत ११ कोटींचा राज्यस्तरीय गौरव

अहिल्यानगर | प्रतिनिधी

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळाले आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात महानगरपालिकेला ५ कोटी रुपयांचे तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.

यापूर्वी माझी वसुंधरा ४.० अभियानातही महानगरपालिकेला राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत ६ कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला होता. या दोन्ही अभियानांतील एकूण ११ कोटी रुपयांच्या पुरस्कारांचे वितरण राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी महापौर ज्योती अमोल गाडे, उपमहापौर धनंजय जाधव आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी पुरस्कार स्वीकारला.

पर्यावरणीय घटकांवर प्रभावी कामगिरी

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पंचमहाभूत घटकांच्या संवर्धनासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. शहरात पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता मोहीम, घनकचरा व्यवस्थापन सुधारणा आणि जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे पार पाडण्यात आले.

महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे तसेच नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

अहिल्यानगर महानगरपालिकेने सलग दोन वर्षे राज्यस्तरीय पुरस्कार पटकावत पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने भक्कम पावले उचलल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *