( MDS Examination ) श्री तिलोक जैन विद्यालयाच्या माजी प्राचार्य स्व. बन्सीलाल भंडारी यांची नात आणि प्राचार्य अजय भंडारी यांची सुकन्या डॉ. पूर्वा अजय भंडारी हिने लोणी येथील रूरल डेंटल कॉलेजमधून एम.डी.एस. (रूट कॅनाल तज्ञ) ही परीक्षा प्रथम श्रेणीत, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
डॉ.पूर्वा हिने यापूर्वी बी.डी.एस. परीक्षेतही उत्कृष्ट कामगिरी करून शैक्षणिक क्षेत्रात आपली प्रतिभा सिद्ध केली होती. तिने आपले प्राथमिक ते बारावीपर्यंतचे शिक्षण श्री तिलोक जैन विद्यालय, पाथर्डी येथे पूर्ण केले.
तिला प्रथितयश दंततज्ञ डॉ. तोष्णीवाल यांचे मार्गदर्शन लाभले असून, तिच्या यशामागे परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाचे बळ असल्याचे तिच्या सहाध्यायींनी सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पाथर्डी तालुका तसेच जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रातून डॉ. पूर्वा भंडारी यांचे अभिनंदन होत आहे. आनंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अभय भंडारी यांची ती पुतणी असून, त्यांच्या मार्गदर्शनाचाही लाभ तिला झाला आहे.