
नगर तालुका | प्रतिनिधी
निंबळक येथील मानाची देवी असलेल्या कामख्यादेवीचा नवरात्रोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या उत्सवाला राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मान्यवरांच्या पत्नी आवर्जून हजेरी लावत आहेत.
सोमवार, ता. २९ सप्टेंबर २०२५ रोजी म्हणजेच सातव्या माळेला, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई गोरे देवीचे शुभआशीर्वाद घेण्यासाठी निंबळक, ता. नगर, जि. अहमदनगर येथे येणार आहेत. त्यांना गेल्या वर्षीचा सप्तमीचा दिव्य कलश देण्यात आला होता.
यंदाचा नवरात्रोत्सव आयोजक संतोष घोलप यांनी ‘कामख्यादेवीचा नवरात्र’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे, कारण या उत्सवासाठी २७०० किलोमीटर दूर असलेल्या गुवाहाटीच्या कामख्यादेवी मंदिरातून ज्योत आणण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या पंचमीच्या दिवशी शनिवारी, ता. २७ सप्टेंबर रोजी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभाताई पाचपुते यांनी हजेरी लावली. पंचमीचा सप्तगंगेचे जल असणारा दिव्य कलश त्यांना प्रदान करण्यात आला.
तसेच या वर्षीच्या उत्सवातील विशेष आकर्षण असलेला पंचमीचा कलशानंतर ‘सप्तगंगेचे जल’ असलेला सप्तमीचा ‘दिव्य कलश’ कोणाला मिळणार याबद्दल भाविकांमध्ये असलेली उत्सुकता आता संपली आहे.
आयोजक संतोष घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्तमीच्या दिवशी सुवासिनीला दिला जाणारा आणि भारतातील सात नद्यांचे (सप्तगंगेचे) जल असणारा हा पवित्र दिव्य कलश या वर्षी अहमदनगर येथील उद्योजक नरेंद्र फिरोदीया यांच्या पत्नी राखी फिरोदीया यांना देण्यात येणार आहे.
संतोष घोलप यांच्याकडून दरवर्षी या भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक एकोपा जतन केला जातो.



