अहिल्यानगर | प्रतिनिधी :
प्रयास ग्रुपच्या वतीने मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. संस्कृती, सण-उत्सव आणि महिला सक्षमीकरण यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
सारसनगर येथील श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या सभामंडपात आयोजित या कार्यक्रमात नगरसेविका गीतांजली काळे, अनिता शेटिया, मीना चोपडा, सुजाता पडोळे, संगीता गणेश भोसले आणि मनीषा प्रकाश भागानगरे उपस्थित होत्या. यावेळी सर्व नगरसेविकांचा सत्कार करून महिलांच्या नेतृत्वाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास श्रुती मनवेलीकर, गीतांजली भागानगरे, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सचिव हिरा शहापुरे, खजिनदार मेघना मुनोत यांच्यासह ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी घेण्यात आलेल्या मनोरंजनात्मक, कौशल्यात्मक आणि बौद्धिक स्वरूपाच्या विविध स्पर्धांचा महिलांनी मनसोक्त आनंद घेतला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयास ग्रुपच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना श्रुती मनवेलीकर यांनी सांगितले की, मराठी संस्कृतीचा वारसा महिलांमुळेच टिकून आहे. अशा कार्यक्रमांतून महिला एकत्र येऊन संस्कार आणि संस्कृतीचा जागर करीत असून, त्यांच्या माध्यमातून संस्कारी पिढी घडत आहे. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हळदी-कुंकू सोहळ्यासोबत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, प्रयास ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासावर वर्षभर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नवनिर्वाचित महिला नगरसेविकांनी महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्धपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. विविध स्पर्धांतील विजेत्यांना सुरभी ब्युटी पार्लरच्या संचालिका श्रुती मनवेलीकर यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी लड्डा यांनी केले, तर ज्योती कानडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



