अहिल्यानगर | जैनवार्ता
अहिल्यानगर येथे येत्या ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या दोन दिवसीय सेनापती बापट साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी-लेखक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत साहित्य आणि संस्कृती मंडळांच्या समन्वयाने हे संमेलन आत्मनिर्धार फाउंडेशन (निंबळक, ता. अहिल्यानगर) तर्फे आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती संयोजक सचिन मोहन चोभे यांनी दिली.
संमेलनाचे आयोजन सुखकर्ता लॉन व मंगल कार्यालय, नेप्ती बायपास चौकाजवळ, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे होणार आहे. स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट यांच्या विचारांना उजाळा देण्याच्या उद्देशाने या संमेलनास त्यांचे नाव देण्यात आले आहे.
संयोजक चोभे यांनी सांगितले की, “यावर्षी राज्यात निर्माण झालेल्या ओला दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी-कष्टकरी यांच्या प्रश्नांवर साहित्याच्या माध्यमातून संवाद घडवावा, या हेतूनेच ग्रामीण वास्तव जाणणारे साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.”
दोन दिवसीय संमेलनात व्याख्यान, लोककलांचे सादरीकरण, परिसंवाद आणि काव्यसंमेलन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा निरीक्षक बी. जी. शेखर व डॉ. राजेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू असून सर्व सत्रांसाठी नामांकित व नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत असताना ग्रामीण संवेदना आणि शेती-मातीचा सुगंध जपणारे कवी म्हणून इंद्रजीत भालेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे संयोजन समितीचे कार्याध्यक्ष ह. भ. प. सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी सांगितले.
आयोजक संस्था आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील सर्व साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी संमेलनात सहभागी होणार आहेत. महिला साहित्यिकांना विशेष व्यासपीठ देण्यावर आमचा भर आहे.”
संयोजन समितीचे समन्वयक लेखक रामदास कोतकर यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील सर्व साहित्य संस्थांशी संपर्क साधून नवसाहित्यिक आणि प्रगल्भ लेखक यांना एकत्र आणले जात आहे. काटेकोर नियोजनातून हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी संस्मरणीय ठरणार आहे.”
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी साहित्यप्रेमींनी सामाजिक व आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन आयोजाकांनी केले आहे.

अहिल्यानगर | जैनवार्ता
