सामाजिक जबाबदारीची भावना — खरी शिक्षणाची दिशा : स्वाती चेमटे लिटल वंडर स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘मिशन माणुसकी’तून पूरग्रस्तांना मदतीचा हात

नगर तालुका | जैनवार्ता

जेऊर येथील लिटल वंडर स्कूल अँड विश्डम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाजाप्रती असलेली जाणीव आणि सहकार्यभाव दाखवत पूरग्रस्त बांधवांसाठी ‘मिशन माणुसकी’ ही मदत मोहिम राबवली. अलीकडील मुसळधार पावसामुळे अनेक भागात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीबाबत समजताच विद्यार्थ्यांनी स्वतःहून मदतीचा हात पुढे करत सामाजिक जाणिवेचे आदर्श उदाहरण घालून दिले.

विद्यार्थ्यांनी आपल्या खिशातील पैसे, खाऊ तसेच घराघरातून गोळा केलेले कपडे, वह्या, पुस्तके, अन्नधान्य आणि वापरण्यायोग्य साहित्य जमा करून शाळेत आणले. संचालिका स्वाती चेमटे आणि मुख्याध्यापक सुशिल खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साहित्य पॅक करून पूरग्रस्तभागा साठी “ मिशन माणुसकी ” ह्यांच्या मार्फत पूरग्रस्त भागात पाठविणे साठी तयार करण्यात आले.

संचालिका स्वाती चेमटे म्हणाल्या, “लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होणे, हीच खरी शिक्षणाची दिशा आहे.”

तर मुख्याध्यापक सुशिल खेडकर यांनी सांगितले, “लिटल वंडर स्कूलचे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर समाजकार्यातही आघाडीवर आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

या उपक्रमासाठी मनिषा क्षेत्रे, कल्पना वड्डेपल्ली, मुशरा खान, मिनाक्षी साळवे, आमरिन पठाण, डेव्हिड भोसले आदी शिक्षकांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, दयाभाव आणि मानवतेची जाणीव दृढ झाली आहे.

‘दैनिक रयत समाचार’च्या मिशन माणुसकी आवाहनास प्रतिसाद देत लिटल वंडर स्कूलच्या वतीने डेव्हिड भोसले यांनी संकलित साहित्य रयत समाचार कार्यालयात सुपूर्द केले. यावेळी उपसंपादक दिपक शिरसाठ, सहसंपादक तुषार सोनवणे, दिपक नेटके, संपतराव रोहोकले आदी उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांच्या समाजाभिमुख कार्याचे पालक व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *