सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ७७ वा वर्धापन दिन; जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

पुणे | प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा ७७ वा वर्धापन दिन मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात संपन्न होणार आहे.

या वर्धापन दिन समारंभासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या शुभहस्ते यावर्षीचे जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी असणार आहेत.

विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रांत आपल्या संपूर्ण कार्यकाळात उल्लेखनीय व भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, सहकार, पर्यावरण व कला अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेणारा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.

७७ व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वर्गीय माननीय अजितदादा पवार, व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री डॉ. अशोक खाडे, सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल अप्पासाहेब दादाबा राजळे, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. डॉ. पंडित विद्यासागर तसेच कला क्षेत्रातील योगदानाबद्दल शमा भाटे यांना यावर्षीचा जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *