अहिल्यानगर | प्रतिनिधी
केडगाव येथील श्री आनंद पार्श्व गुरुकुलचे भव्य स्नेहसंमेलन शनिवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी २.०० वाजता केशर-गुलाब मंगल कार्यालय, आनंदधाम समोर येथे उत्साहात पार पडणार आहे. या शाळेच्या स्थापनेला अवघे चार वर्षे पूर्ण होत असताना, अल्पावधीतच शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संस्कारवर्धक क्षेत्रात शाळेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
शाळेची भव्य आणि सुसज्ज इमारत राष्ट्रसंत प. पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या कृपा-आशीर्वादाने तसेच महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. कुंदन ऋषीजी महाराज व संस्कारप्रेमी अलोक ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने सोनेवाडी रोड, केडगाव येथे उभी राहिली. सर्व जाती-धर्मातील विद्यार्थी “शिक्षा, सेवा आणि संस्कार” या त्रिसूत्री ब्रीदवाक्याखाली शिक्षण घेत असल्याने शाळेची ओळख एक संस्कारगुरुकुल म्हणून झाली आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या स्नेहसंमेलनाला मुख्य अतिथी म्हणून मा. श्री आनंदजी सुभाषजी भंडारी (I.A.S.) उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक व शिक्षणप्रेमी मा. श्री आनंदराजजी चंदनमलजी मुनोत आणि ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रो. डॉ. श्री अशोककुमार पगारिया (कासारवाडी) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
सांस्कृतिक वैविध्याची मेजवानी
वर्षभरातील शैक्षणिक व कलात्मक उपक्रमांचा आढावा या स्नेहसंमेलनात सादर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण ठरणार आहेत.
देशभक्तीपर गीत
लोकनृत्य
सामाजिक संदेश देणारी लघुनाटिका
विविध प्रादेशिक नृत्यांचे सादरीकरण
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि व्यवस्थापन समितीने तयारीचा अंतिम टप्पा पूर्ण केला आहे. कार्यक्रमाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उपस्थितीचे आवाहन
व्यवस्थापन समितीने सर्व पालक, हितचिंतक व नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.



