अहिल्यानगर | (पाथर्डी) प्रतिनिधी
कासार पिंपळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, संघभावना आणि सृजनशीलतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती सदस्य मा. श्री मुरली तात्या भगत होते. मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विलासराव भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी श्री नवनाथजी तिजोरे व श्री गणेश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी माजी विद्यार्थी श्री नवनाथजी तिजोरे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व उद्योजकीय दृष्टिकोन विकसित होतो, असे मत व्यक्त केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री गोसावी सर यांनी बाल आनंद मेळाव्याचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करताना, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम भविष्यातील व्यावहारिक जीवनासाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले.
मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल्स उभारून फळभाज्या, पाणीपुरी, वडापाव, भेळ, केक आदी पदार्थ विक्रीस ठेवले होते. आकर्षक मांडणी व उत्स्फूर्त सहभागामुळे मेळाव्याला विशेष रंगत आली. विद्यार्थी तसेच बहुसंख्य पालकांनी स्टॉल्सना भेट देत खरेदी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवाजी लवांडे यांनी केले, तर प्रास्ताविक विजय भताने सर यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या वेळी शिक्षकवृंद व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाल आनंद मेळाव्यामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणात उत्साह व आनंदाची लहर पसरली.



