अहिल्यानगर | प्रतिनिधी
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” हा स्नेहाचा संदेश देत तसेच शाळेच्या नवीन इमारतीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुल, केडगाव (अहिल्यानगर) येथे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या आवारात विविध सांस्कृतिक व उपक्रमात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या कमिटी सदस्य मेघा मयूर बोरा यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. यानंतर प्राचार्या कादंबरी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीचे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व सोप्या शब्दांत समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पारंपारिक वेशभूषेत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात महिला पालक वर्गांसाठी हळदी-कुंकू, उखाणे तसेच विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी एकमेकांना व शिक्षकांना तिळगुळ देत “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” अशा शुभेच्छा दिल्या. काही विद्यार्थ्यांनी संक्रांतीविषयक गीते सादर केली, तर काहींनी सणाचे महत्त्व सांगणारी माहितीपूर्ण भाषणे दिली.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी आपुलकी व जिव्हाळा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योग विशेषतज्ञ अभिजीत शहा यांनी योग, आहार, पालक-विद्यार्थी नाते, आत्मविश्वास तसेच पालकांच्या अपेक्षा या विषयांवर प्रभावी व मार्गदर्शक विचार मांडले.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मीनाताई संजयजी चोपडा व सौ. अनिता विपुलजी शेटिया उपस्थित होत्या. गुरुकुलच्या सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
संस्कार, शिक्षण व सेवा यांचा त्रिवेणी संगम असलेल्या अहिल्यानगरमधील एकमेव श्री आनंद पार्श्व गुरुकुल, सोनेवाडी रोड, अहिल्यानगर येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी प्ले ग्रुप ते इयत्ता दहावीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी मेघा बोरा (९९२२२०२३५२) व कादंबरी सूर्यवंशी (८०८७८३९४३१) यांच्याशी संपर्क साधावा.



