“वाचन हीच खरी क्रांती” — प्रा. डॉ. चौरे यांचा विद्यार्थ्यांना संदेश

अहिल्यानगर | जैनवार्ता

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात भारतरत्न व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य प्रा. डॉ. बबन चौरे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले.

डॉ. चौरे म्हणाले, “आज मोबाईलच्या स्क्रीनवर फिरणारी बोटे पुस्तकांच्या पानांवर फिरायला हवीत. प्रत्येक विद्यार्थ्याने व्यक्तिमत्व विकास, मनोरंजन, अभ्यास आणि करिअर घडविण्यासाठी नियमित वाचन केले पाहिजे. प्रत्येक पुस्तकाला एक वेगळा सुगंध आणि आत्मिक आनंद असतो.”

ते पुढे म्हणाले की, “भारतामध्ये दोन असे राष्ट्रपती होऊन गेले आहेत, ज्यांचा वाढदिवस प्रेरक दिन म्हणून साजरा केला जातो — डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून. कलाम हे २००२ मध्ये भारताचे ११ वे राष्ट्रपती बनले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेतृत्व करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. राष्ट्रपतीपदानंतरही ते शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेत कार्यरत राहिले.”

डॉ. चौरे यांनी आजच्या सोशल मिडीयाच्या प्रभावावर भाष्य करताना सांगितले, “सोशल मिडीयामुळे विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत आहे. इंटरनेटवरील साहित्य वरवरचे असते; खरे ज्ञान आणि विचारांची खोली फक्त पुस्तकांतूनच मिळते. भविष्यात शिक्षण जर पूर्णपणे अभासी (व्हर्च्युअल) झाले, तर शिक्षक आणि पुस्तके दोघांनाही थारा नसेल, ही चिंतेची बाब आहे.”

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परीक्षण स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेखर ससाणे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. आशा पालवे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. किरण गुलदगड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *