पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात पार पडलेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धा २०२५ मध्ये अहिल्यानगर येथील विद्यार्थिनी दिया प्रीतम छाजेड हिने देशभरातील हजारो स्पर्धकांमध्ये चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
दियाने स्वतःच्या कल्पकतेवर आधारित “मोबाईलवर नियंत्रित शेतीसाठी उपयुक्त रोबोट” सादर केला. हा रोबोट नांगरणी, पेरणी, फवारणी, तसेच तापमान आणि आर्द्रतेचे मोजमाप करण्यास सक्षम आहे. या अभिनव कल्पनेने परीक्षकांची मने जिंकत दियाला ३० हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
मूळची अहिल्यानगरची असलेली दिया सध्या विद्या प्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर प्रशालेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. तिच्या प्रकल्पामुळे तिला आता एस्टोनिया (उत्तर युरोप) येथे डिसेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
दियाच्या या यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रालाही अभिमानाचा क्षण लाभला आहे. तिच्या यशामागे आई शितल छाजेड, वडील प्रीतम छाजेड आणि शिक्षिका आस्मा यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे आजोबा, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे एजंट प्रमोदकुमार छाजेड यांनी अभिमानाने सांगितले की, “दियाने कुटुंबाचेच नव्हे तर जिल्ह्याचेही नाव उज्ज्वल केले.”
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे दियाचे स्वप्न आता युरोपच्या व्यासपीठावर झळकणार आहे.