वेतनकपात व सुट्ट्यांचे थकित प्रकरण तापले; मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांचा राज्यभर कामबंदचा इशारा

अहिल्यानगर | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पेमेंट वाढ, बोनस आणि सुट्ट्यांच्या मोबदल्याची थकबाकी तत्काळ देण्याची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव समीर शेख, कायदेशीर सल्लागार ॲड. श्रीरंग गिते तसेच सोपान शिंदे, रवी साळवे, बाबासाहेब गायकवाड, शामसुंदर जाधव, अश्फाक शेख, नारायण पाटील, किरण निकम आदी उपस्थित होते.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे प्रस्ताव रद्द करून उलट ५०० ते ६००० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. तसेच वर्ष २०२५ मधील सर्व सुट्ट्या आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचे सुमारे ११,४०० रुपयांचे वेतन थकले आहे.

पुण्यातील लेबर कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, चर्चेनंतर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

संघटनेने स्पष्ट इशारा दिला की, सोमवारपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर कामबंद आंदोलन छेडले जाईल. जोपर्यंत थकबाकी व पेमेंटवाढ अंमलात आणली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही.

या आंदोलनाचा परिणाम अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, हिंगोली, लातूर, परभणी, औरंगाबाद, बुलढाणा, नांदेड अशा जिल्ह्यांतील मोबाईल नेटवर्क सेवांवर होऊ शकतो, असा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या मते, लेबर कमिशनर यांच्या हस्तक्षेपानंतरही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आता सर्व जिल्ह्यांमध्ये संघटित आंदोलन उभारले जाणार आहे. मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन केवळ वेतनवाढीसाठी नव्हे, तर “कष्टाला न्याय्य मोबदला मिळवण्यासाठी” असल्याचे संघटनेने ठामपणे नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *