शाश्वत भारतासाठी मूल्याधारित शिक्षणदृष्टी आवश्यक — डॉ. सुरेश पठारे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांसाठी सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेत विशेष प्रशिक्षणाचे आयोजन
शाश्वत भारतासाठी मूल्याधारित शिक्षणदृष्टी आवश्यक — डॉ. सुरेश पठारे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांसाठी सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्थेत विशेष प्रशिक्षणाचे आयोजन
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत शिक्षक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यानुसार हंडीनिमगाव (नेवासा फाटा) येथील रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई पॅटर्न) यांच्या शिक्षकांसाठी सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, अहमदनगर यांच्या वतीने एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे आयोजन सीएसआरडी संस्थेच्या “एज्युव्हिजन 2040: शाश्वत भारतासाठी शाळा – सक्षम शिक्षक” या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले होते. प्रकल्पाचा उद्देश शिक्षकांमध्ये मूल्याधारित शिक्षणदृष्टी, आत्मपरीक्षण आणि व्यावसायिक क्षमतावृद्धी घडविणे हा आहे.
उद्घाटन सत्रात सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी शिक्षकांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले,
“शिक्षक असणे म्हणजे फक्त विषय शिकविणे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवनदृष्टीचा पाया घालणे आहे. प्रत्येक शिक्षकाने आत्मपरीक्षण करून आपल्या अध्यापनाची परिणामकारकता तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षण हे मूल्याधारित, संवेदनशील आणि नाविन्यपूर्ण असावे.”
या प्रसंगी रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन भाऊसाहेब अंबाडे, प्रिन्सिपल मॅथ्यू येवले, व्हाईस प्रिन्सिपल पिटर बारगळ, प्री-प्रायमरी इंचार्ज मनिषा मॅडम, देविदास कुटे, तसेच सीएसआरडीचे डॉ. विजय संसारे, डॉ. प्रदीप जारे आणि सॅम्युअल वाघमारे उपस्थित होते.
कार्यशाळेत शिक्षकांसाठी आचारसंहिता, नैतिक जबाबदाऱ्या, संवाद कौशल्य, विद्यार्थ्यांशी वागण्यातील संवेदनशीलता आणि आत्मपरीक्षणाचे महत्त्व या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शिक्षकांनी वर्गातील आव्हाने, विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल आणि संवादातील अडचणी या बाबींबाबत प्रश्नोत्तर सत्रात मोकळेपणाने मत मांडले.
शेवटी प्रिन्सिपल मॅथ्यू येवले यांनी सर्व प्रशिक्षकांचे आभार मानले आणि म्हणाले,
“सीएसआरडी संस्थेच्या सहकार्याने आयोजित या प्रशिक्षणामुळे आमच्या शिक्षकांमध्ये नव्या ऊर्जेचा आणि दृष्टिकोनाचा संचार झाला आहे. या मार्गदर्शनाचा प्रभाव निश्चितच अध्यापन प्रक्रियेत दिसेल.”
या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाला शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमातून शिक्षकांच्या मनात आत्मचिंतन, प्रेरणा आणि मूल्याधारित शिक्षणाची दृष्टी अधिक दृढ झाली.