आत्मध्यानाने मिळते अंत:शांती — आनंदधाम येथे आत्मध्यान शिबिरास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर | जैनवार्ता

आजच्या धकाधकीच्या युगात माणूस पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे धावताना अंत:शांती गमावून बसला आहे. अशांत मनःस्थिती आणि तणावामुळे समाजात आजार, नैराश्य आणि असंतुलन वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आत्मध्यान ही एक अशी साधना आहे जी व्यक्तीला अंतर्मुख करते आणि जीवनात शांती व समभाव निर्माण करते.

अशा आत्मशांतीचा संदेश देणारे संत विभूती, महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. श्री कुंदनऋषिजी म.सा. यांच्या 92 व्या जन्मोत्सवानिमित्त आनंदधाम येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम राष्ट्रसंत आचार्य प. पू. श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या पवित्र चरणी लीन झालेल्या या महान संताच्या जन्मदिना निमित्त साजरे केले जात आहेत.

7 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या पंचदिवसीय उत्सवाचा एक भाग म्हणून 9 नोव्हेंबर, रविवार रोजी सकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत आत्मध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जैन धर्मीयांचे वर्तमान ध्यानयोगी पू. श्री डॉ .शिवमुनिजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात 400 साधकांनी सहभाग नोंदवला.

शिबिरासोबतच लहान मुलांसाठी ड्रॉईंग स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये धार्मिक संस्कारांची बीजे रोवली गेली.

आगामी 11 नोव्हेंबर रोजी पूज्य प्रवर्तकश्रीजी कुंदनऋषीजी म.सा. यांचा जन्मदिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सकाळी 9 वाजता जप व गुरु गुणानुवाद सभा आयोजित करण्यात आली आहे.

सर्व श्रावक-श्राविकांनी या मंगल प्रसंगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व श्री तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *