योग-ध्यानाने उजळला बालदिन : जे.एस.एस. गुरुकुलमध्ये ‘उत्कर्ष योग शिबिर’ उत्साहात

अहिल्यानगर | जैनवार्ता

केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जे.एस.एस.) मध्ये बालदिनानिमित्त आयोजित ‘उत्कर्ष योग शिबिर’ उत्साहात पार पडले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आयोजित या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम व ध्यानधारणेचे मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

अरणगाव रोड, रानवारा येथील गुरुकुलच्या नवीन वास्तूत पार पडलेल्या शिबिरात बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी शिवतेज यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे सविस्तर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून सुदर्शन प्रक्रियाही करवून घेण्यात आली.

स्वामी शिवतेज म्हणाले, “आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत योग आणि ध्यान अत्यंत आवश्यक आहे. मोबाईलच्या अति वापरामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होते. योग-प्राणायामामुळे मन:शांती मिळते, तसेच एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.” जे.एस.एस. गुरुकुलसारख्या संस्थांमध्ये अशा संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे लक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्राचार्या निकिता कटारिया म्हणाल्या की, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती जितकी महत्त्वाची, तितकीच त्यांची मानसिक व आध्यात्मिक वाढही आवश्यक आहे. त्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून योग शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शाळेत दररोजच्या प्रार्थनेपूर्वी विद्यार्थ्यांना काही मिनिटे योग व ध्यान करण्याची सवय लावण्यात आली असून, त्यातून शांतता, एकाग्रता व संस्कार यांची जोड मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. “योग केल्यावर मन शांत होते आणि अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित होते,” अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून मिळाल्या. बालदिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या या उपक्रमामुळे जे.एस.एस. गुरुकुल परिसर योगमय व ऊर्जामय झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *