ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रयोगात्मक शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी इन्फोसिस कंपनीने उभारलेली अत्याधुनिक विज्ञान बस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धोत्रे खुर्द येथे दाखल झाली. धोत्रे खुर्द आणि तुफानवस्ती परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या बसला भेट देत प्रत्यक्ष विज्ञानाचा अनुभव घेतला.
या अभिनव उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि लोकल फंड सहाय्यक संचालक रमेश कासार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पुढाकार घेतला. ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रत्यक्ष प्रयोग दाखवून त्यांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडविण्याचा उद्देश या प्रकल्पामागे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सायन्स लॅब बसमध्ये प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकतेची तेजस्वी चमक दिसून आली. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग, हाताळण्यायोग्य उपकरणे, कृती-प्रणाली स्पष्ट करणारी मॉडेल्स आणि गुंतागुंतीच्या विज्ञान संकल्पनांचे सोपे स्पष्टीकरण यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा मनसोक्त आनंद घेतला. “इतके प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याची आणि हाताळण्याची ही पहिलीच वेळ. हा अनुभव अविस्मरणीय ठरेल,” अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
शिक्षकांच्या मते, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड, आत्मविश्वास आणि जिज्ञासा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी थेट प्रयोगशाळेचा अनुभव देणारी ही विज्ञान बस म्हणजे खऱ्या अर्थाने चालती-बोलती विज्ञानशाळा आहे,” असे शिक्षकांनी सांगितले.
पालकांनीही इन्फोसिसच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले असून हा प्रकल्प ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी म्हटले. आधुनिक तंत्रज्ञान गावागावात पोहोचवणारी ही विज्ञान बस मुलांसाठी विशेष आकर्षण ठरली आहे.
इन्फोसिसच्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडणारा नवा मार्ग उपलब्ध झाला असून त्यांच्या विज्ञानस्वप्नांना नवी भरारी मिळत आहे.