Education | शिष्यवृत्ती प्रस्ताव रखडले; विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त

अहिल्यानगर | प्रतिनिधी

(Education) कचरा वेचक कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संयुक्त मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना प्रस्तावांच्या प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबाबत कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट आणि समाज कल्याण निरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. पंचायतचे जिल्हाध्यक्ष विकास उडाणशिवे यांनी हा गंभीर प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.

(Education) शहरात सुका कचरा संकलन करून उदरनिर्वाह करणारा मोठा समाजवर्ग आहे. अतिशय कमी उत्पन्नामुळे या मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येतो. हा प्रश्न लक्षात घेऊन राज्य व केंद्र सरकारने संयुक्तपणे सुरू केलेल्या मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत कचरा वेचकांच्या पाल्यांचा समावेश करण्यात आला असून या योजनेमुळे हजारो कुटुंबांना शैक्षणिक मदतीचा हात मिळत आहे.

(Education) तथापि, काही तांत्रिक कागदपत्रांमुळे अहिल्यानगरमधील अनेक पात्र विद्यार्थ्यांना अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. हा अडथळा दूर करण्यासाठी पंचायतने विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती, वर्गनिहाय तपशील आणि ‘कचरा वेचक’ असल्याची प्रमाणपत्रे जोडून प्रस्तावांची पूर्तता पूर्ण केली. ता. २२ एप्रिल २०२५ रोजी हा प्रस्ताव सीताराम सारडा विद्यालयाकडे सुद्धा जमा करण्यात आला.

पंचायतीने निवेदनात नमूद केले की, सर्व आवश्यक माहिती दिली असूनही शाळेकडून शासनाकडे प्रस्ताव न पाठवणे हे चिंताजनक आहे. प्रस्ताव वेळेत न गेल्यास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे नुकसान होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी शाळा प्रशासनाची असेल, असा स्पष्ट इशारा पंचायतने दिला आहे.

शाळेला तातडीने प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत, तसेच प्रस्ताव न गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक तोटा झाल्यास तो शाळेकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी कष्टकरी पंचायतने समाज कल्याण विभागाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *