पाथर्डी | प्रतिनिधी
( Spirituality )श्री मोहटादेवी देवस्थानच्या नव्याने नियुक्त दहा विश्वस्तांची पहिली परिचय बैठक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. देवस्थानच्या आगामी कामकाजाचे नियोजन, भाविकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
न्यायाधीश शेंडे यांनी देवस्थानच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करताना मंदिर परिसराचा समतोल, सुरक्षित आणि नियोजित विकास करण्यावर भर दिला. भाविकांची वाढती गरज लक्षात घेता संपर्क व्यवस्था, माहिती आदान–प्रदान आणि प्रसिद्धीच्या माध्यमांचा प्रभावी वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
बैठकीत भाविक, ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव चर्चिला गेला. बाह्यरुग्ण सेवा लवकर सुरू करण्याबरोबरच देवस्थानाच्या सामाजिक उपक्रमांचा विस्तार करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
भाविकांच्या मागणीनुसार उत्सवमूर्तीवर अभिषेक सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. विविध धार्मिक पूजांची व्यवस्था सुधारण्यासह आगामी वार्षिक उत्सव ग्रामस्थांच्या सहभागातून भव्य आणि शिस्तबद्ध आयोजित करण्यासाठी योजना तयार करण्यावर भर देण्यात आला.
देवीच्या सुलभ दर्शनासाठी आधुनिक दर्शनव्यवस्था उभारणे, रांग व्यवस्थेत सुधारणा करणे आणि डिजिटल सुविधांचा वापर वाढवणे यावरही चर्चा झाली. राज्य आणि केंद्र शासनाच्या सहाय्याने मंदिर परिसराचा अधिक व्यापक विकास करण्याचा निर्णय विश्वस्तांनी एकमताने घेतला.
देवस्थानच्या प्रगतीसाठी संकल्पित कार्ययोजना तयार करून तातडीने अंमलबजावणीस सुरुवात करावी, याबाबत सर्व विश्वस्तांनी सहमती दर्शवली. पदसिद्ध विश्वस्त तसेच न्यासाचे चेअरमन व जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांच्या नेतृत्वाखाली मिशन मोडमध्ये काम करण्याचे विश्वस्तांनी आश्वासन दिले. भाविकांच्या सहकार्याने मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक ठळकपणे जपण्याची बांधिलकीही व्यक्त करण्यात आली.
बैठकीस बाबासाहेब दहिफळे, शशिकांत दहिफळे, शुभम दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. कल्याण बडे, ॲड. प्रसन्न दराडे, श्रीकांत लाहोटी, ऋतिका कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन ॲड. विक्रम वाडेकर यांनी केले. प्रास्ताविक शुभम दहिफळे यांनी, तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले.



