अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहमदनगर महाविद्यालय येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. अभिजित आहेर व डॉ. अविनाश गावडे यांना “संमिश्र नायट्रोजन खत व वनस्पती वाढ प्रवर्तक आणि त्याची निर्मिती प्रक्रिया” या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी भारतीय पेटंट कार्यालय, भारत सरकार यांच्याकडून पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या यशामुळे शेती व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडली असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या संशोधनात विशिष्ट रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून वनस्पतींसाठी उपयुक्त, पोषक व परिणामकारक असे संमिश्र नायट्रोजन खत व वनस्पती वाढ प्रवर्तक विकसित करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पर्यावरणपूरक असून हरित रसायनशास्त्राच्या तत्त्वांनुसार रचलेली असल्याने शाश्वत शेतीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
सूक्ष्मजीवशास्त्र विभागाला मिळालेले हे तिसरे पेटंट असून विभागातील संशोधन परंपरा, नावीन्यपूर्ण विचार व शास्त्रीय दृष्टिकोनाची ही ठोस पावती मानली जात आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची प्रेरणा मिळून भविष्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी बी.पी.एच. हिवाळे सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर. जे. बार्नबस, महाविद्यालयाचे प्राचार्य नोएल पारगे तसेच डॉ. सय्यद रज्जाक उपस्थित होते. डॉ. बार्नबस यांनी या संशोधन कार्याचे विशेष कौतुक करत पर्यावरणपूरक व हरित रसायनशास्त्रावर आधारित संशोधन ही आजच्या काळाची गरज असल्याचे नमूद केले. बी.पी.एच. हिवाळे सोसायटीकडून संशोधन व नवोपक्रमाला सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासन देत त्यांनी प्रा. अभिजित आहेर व डॉ. अविनाश गावडे यांचे अभिनंदन केले.



