गोवा | प्रतिनिधी
भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स 2025-26 स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र शुभम सीमा अरुण हंबीरराव याने ॲथलेटिक्सच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले.
गोव्यातील पोद्देम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मापुसा येथे 20, 21 व 22 जानेवारी रोजी झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तीव्र आणि चुरशीच्या स्पर्धेत शुभमने दमदार धाव घेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
शुभम हा भा.पां. हिवाळे शिक्षणसंस्थेच्या सीएसआरडी येथील एम.एस.डब्ल्यू. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून, राणा सिंग व शंकर गायकवाड पाटील यांच्या हस्ते त्याला ट्रॉफी व सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शुभमच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आई-वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आजी-आजोबा, चुलता-चुलती व त्यांची मुले असे एकत्र कुटुंब असलेल्या या घरातून राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू घडल्याने हळगाव गावात आनंदाचे वातावरण आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी शुभमचे विशेष अभिनंदन करत त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शुभमच्या या सुवर्णयशामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा क्रीडाक्षेत्रातील लौकिक राष्ट्रीय स्तरावर अधिक उजळला आहे.



