गोव्यात लांब उडीत सुवर्णझेप; धाराशिवचा आदित्य साठे राष्ट्रीय विजेता

 

अहिल्यानगर | प्रतिनिधी

भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स 2025-26 स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचा सुपुत्र साठे आदित्य अशोक याने ॲथलेटिक्सच्या लांब उडी स्पर्धेत दमदार कामगिरी करत राष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

दिनांक 20, 21 व 22 जानेवारी रोजी गोव्यातील पोद्देम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मापुसा येथे झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तीव्र स्पर्धेत आदित्यने उत्कृष्ट उड्या घेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

आदित्य हा अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज, अहिल्यानगर येथे इयत्ता 12वी मध्ये शिक्षण घेत आहे. पुरस्कार वितरण समारंभात राणा सिंग व शंकर गायकवाड पाटील यांच्या हस्ते त्याला ट्रॉफी व पदक प्रदान करण्यात आले.

धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील चिंचपूर (बु.) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आदित्यच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आई-वडील शेती करून कुटुंबाचा गाडा चालवतात. आई-वडील, आजी व एक बहीण असे एकत्र कुटुंब असलेल्या या घरातून राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता घडल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.

या यशाबद्दल रेसिडेन्शिअल कॉलेजचे संचालक दादासाहेब वांढेकर यांनी आदित्यचे विशेष अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्यच्या या सुवर्णयशाने धाराशिव जिल्ह्याचा क्रीडाक्षेत्रातील लौकिक आणखी उजळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *