अहिल्यानगर | प्रतिनिधी
भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पशु-पक्ष्यांप्रती करुणा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ लक्षात घेऊन भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरातील झाडांवर प्लास्टिकच्या भांड्यांद्वारे पाणी आणि धान्याची व्यवस्था करण्यात आली.
भगवान महावीर यांच्या अहिंसेच्या व सर्व जीवांप्रती प्रेमाच्या विचारातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला. याशिवाय भिंगार येथून निघालेल्या महावीर जयंती शोभायात्रेचे स्वागत करून भाविकांना अल्पोपहाराचे वाटपही करण्यात आले.
हा उपक्रम दिलीप गुगळे, सचिन चोपडा, संतोष लुणिया आणि संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या पुढाकारातून पार पडला. यावेळी रमेश वराडे, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, अशोक पराते, ज्ञानेश्वर महाराज अनावडे, दिलीप ठोकळ, दीपकराव धाडगे, अभिजीत सपकाळ, रतन मेहेत्रे, सुरेखा आमले, नीता देवराईकर, मिनाताई परदेशी, प्रांजली सपकाळ, सुवर्णा महागडे-भिंगारदिवे, संगीता घोटे आदी उपस्थित होते.
यावेळी संजय सपकाळ यांनी अहिंसेचा संदेश अधोरेखित करत पशु-पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे महत्त्व सांगितले. दिलीप गुगळे यांनी पशु-पक्ष्यांची सेवा हीच खरी मानवसेवा असल्याचे नमूद केले, तर सचिन चोपडा यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. ज्ञानेश्वर महाराज अनावडे यांनी भगवान महावीर यांच्या विचारांचे स्मरण करून हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
दरम्यान, जॉगिंग पार्कमधील झाडांवर कायमस्वरूपी पाणी व अन्नाची व्यवस्था ठेवून संपूर्ण उन्हाळ्यात ही सेवा सुरू ठेवण्याचा संकल्प ग्रुपने व्यक्त केला.



