नगर तालुका | प्रतिनिधी
शिवजयंती उत्सवाला प्रबोधनाची आणि विधायकतेची जोड देत इसळक गावातील तरुणांनी यंदा आदर्श उपक्रम हाती घेतले. गावातील युवकांनी एकत्र येऊन ‘शिवजयंती उत्सव समिती’ची स्थापना केली असून, महापुरुषांची जयंती व पुण्यतिधी साजरी करताना वाढत चाललेल्या विकृत व दिखाऊ परंपरांना फाटा देण्याचा निर्धार केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांप्रमाणे शिस्त, स्वाभिमान, समाजहित आणि राष्ट्रनिष्ठा यांचा संदेश समाजात पोहोचावा, या उद्देशाने समितीच्या माध्यमातून गावात भव्य स्वागत कमान उभारण्याचा संकल्प करण्यात आला. ही कमान केवळ सजावटीपुरती मर्यादित न राहता शिवरायांच्या प्रेरणादायी विचारांचे प्रतीक म्हणून उभारण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष नवनाथ आढाव यांनी दिली.
या उपक्रमाला ग्रामस्थांनीही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेकांनी आर्थिक तसेच श्रमदानातून सहभाग नोंदविला आहे, असे समितीचे समन्वयक विकास चव्हाण यांनी सांगितले.
स्वागत कमानीचे भूमिपूजन वीरपत्नी कल्पना महादेव कराळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसेवेसाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कुटुंबाचा सन्मान करून समितीने एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे. कमान उभारणीचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत अर्थात १४ एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचा मानस कार्याध्यक्ष प्रमोद गेरंगे यांनी व्यक्त केला.
शिवजयंती उत्सव हा केवळ उत्साहाचा नव्हे, तर विचारांचा आणि संस्कारांचा उत्सव व्हावा, या भावनेतून पुढील काळातही सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनपर उपक्रम राबविण्याचा संकल्प समितीने केला. गावातील हा विधायक उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रंथालयासाठी कपाट भेट
गावचे सुपुत्र सार्थक जऱ्हाड यांच्या स्मरणार्थ शिवभक्त युवा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या ग्रंथालयासाठी कपाट भेट देण्यात आले. प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता जाधव यांच्याकडे कपाट सुपूर्त केले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरविंद बेरड, मनोज गेरंगे यांनी शाळेतील खो-खो संघातील खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांनाही सन्मानचिन्ह देत त्यांचा गौरव केला.



