संवादातून समाज एकत्र येईल; ‘नब्ज़’ ईद विशेषांकाचे उत्साहात प्रकाशन

अहिल्यानगर | प्रतिनिधी

समाजात संवाद वाढवून दुरावा कमी करण्याची गरज अधोरेखित करत ‘नब्ज़’ ईद विशेषांकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. ‘नब्ज़’चे महाराष्ट्रभर विविध ठिकाणी स्वयंस्फूर्तीने प्रकाशन होत असल्याने हा उपक्रम यशस्वी ठरत असल्याचे प्रतिपादन संपादिका मिनाज लाटकर यांनी केले.

ता. २८ रोजी रहेमत सुलतान हॉल येथे सकल भारतीय समाज यांच्या वतीने आयोजित प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. नगर शहरातही ‘नब्ज़’चे प्रकाशन होणे ही टीमसाठी सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रेमाची भाषा वापरून समाजाला सकारात्मक दिशेने नेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

मिनाज लाटकर पुढे म्हणाल्या की, सध्या समाज धर्म, द्वेष आणि गैरसमज यांच्या वातावरणात अडकला असून त्यामागे संवादाचा अभाव हे मुख्य कारण आहे. बहुसंख्यांक आणि मुस्लिम समाज एकमेकांच्या संस्कृती, भाषा व जीवनशैलीपासून दूर आहेत. ‘दाढी-टोपी’ या मर्यादित ओळखीपलीकडे जाऊन मुस्लिम समाजातील चांगुलपणा, साहित्य आणि प्रगत विचार समाजासमोर आणण्याचा प्रयत्न ‘नब्ज़’मधून केला जात आहे. संवादाची बीजं रुजवून दुराव्याच्या भिंती कोसळतील आणि आपुलकीचा पूल उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी युनूसभाई तांबटकर व आनंद शितोळे यांच्या हस्ते मिनाज लाटकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सोनाली देवढे-शिंदे, संध्या मेढे, मरयम सय्यद आणि मिनाज लाटकर यांच्या हस्ते ‘नब्ज़’ ईद विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक एस. एम. जोशी फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे यांनी केले. त्यांनी ‘नब्ज़’चा प्रवास आणि त्याची सामाजिक गरज अधोरेखित केली. सोनाली देवढे-शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत ‘नब्ज़’ घराघरात पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.

लेखक समीर गायकवाड यांनी ‘प्रतिगामी ते पुरोगामी’ प्रवास उलगडून सांगत येत्या काळात सजग आणि बेधडक काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास अशोक सब्बन, प्रजापती, असिफखान दुलेखान, आबिद खान, इंजि. अभिजित एकनाथ वाघ, डॉ. प्रशांत शिंदे, प्रा. मुदस्सर सय्यद, प्रा. बापू चंदनशिवे, प्रा. अतुल चौरपगार, तुषार सोनवणे, पंकज गुंदेचा, ॲड. विद्या शिंदे-जाधव, रुतुजा शिंदे, फिरोज शेख, डॉ. परवेज अशरफी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी केले, तर आभार रयत समाचारचे संपादक भैरवनाथ वाकळे यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *