प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेम, नम्रता आणि सेवाभावाची शिकवण अंगीकारा – बिशप रेमसन व्हिक्टर मौदी गुरुवार निमित्त अहमदनगर पहिली मंडळी सी.एन.आय. चर्चमध्ये प्रभुभोजन विधी भक्तीभावात संपन्न

अहिल्यानगर | प्रतिनिधी

ख्रिस्ती श्रद्धेत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मौदी गुरुवार हा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसोबत घालवलेल्या शेवटच्या क्षणांची आठवण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्ताने प्रेम, सेवा आणि नम्रतेचा आदर्श घालून देत शिष्यांचे पाय धुऊन एकमेकांवर प्रेम करण्याचा संदेश दिला. तसेच, शिष्यांसोबत शेवटचे भोजन करून प्रभुभोजन विधीची स्थापना केली.

या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील पहिली मंडळी सी.एन.आय. चर्चमध्ये प्रभुभोजन विधी अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ख्रिस्ती बांधवांनी या विधीत सहभागी होत प्रभूच्या त्याग आणि प्रेमाची आठवण जागवली.

यावेळी नाशिक धर्मप्रांताचे मॉडरेटर एपिस्कोपल कॉमेसरी बिशप रा. रेव्ह. रेमसन व्हिक्टर यांनी आपल्या संदेशातून मौदी गुरुवारचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेला प्रेम, नम्रता आणि सेवाभावाचा मार्ग प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या जीवनात स्वीकारणे आवश्यक आहे. प्रभूचा प्रेमाचा संदेश केवळ शब्दांत न राहता तो आचरणात उतरवणे हीच खरी श्रद्धा आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच, बिशप रा. रेव्ह. व्हिक्टर यांच्या हस्ते मंडळीतील नवोदित तरुणांचा दृढीकरण विधीही पार पडला. या विधीद्वारे तरुणांनी आपल्या श्रद्धेची दृढ प्रतिज्ञा करत ख्रिस्ती जीवन अधिक जबाबदारीने आणि मूल्याधिष्ठित पद्धतीने जगण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी प्रिस्ट इन चार्ज रेव्ह. सतीश तोरणे, रेव्ह. डिकन नूतन कांबळे यांच्यासह मंडळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *