आगडगावात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आगडगाव (जि. अहिल्यानगर) | प्रतिनिधी

समता फाउंडेशन, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे तसेच सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालय, अहिल्यानगर आणि ग्रामपंचायत कार्यालय आगडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नि:शुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनात प्रा. डॉ. सुरेश मुगुटमल तसेच सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे शिबिराची अंमलबजावणी प्रभावीपणे पार पडली.

शिबिरामध्ये एकूण ६४ ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी १८ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे येथे पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. या रुग्णांसाठी ने-आण, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आयोजकांकडून विनामूल्य करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच शस्त्रक्रियेनंतर लागणारी औषधे आणि काळे चष्मेही मोफत देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला सरपंच परमेश्वर पालवे, समता फाउंडेशनचे समन्वयक अभिषेक शिंदे तसेच वैद्यकीय तज्ज्ञांची उपस्थिती होती. शिबिराचे आयोजन सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सागर टिके व रोहन सोनवणे यांनी केले.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *