अहिल्यानगर | प्रतिनिधी
श्री आनंदऋषी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत रोग तपासणी शिबिरामध्ये इंडो युरॉलॉजिकल (मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय) तसेच स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले. आयोजक भगवानदास गुगळे (भातकुडगाव वाला) मंगला गुगळे, डॉ. पंकज गुगळे, महेश गुगळे, सोनल गुगळे, स्मिता गुगळे, अनुपमा भंडारी, रुखमनबाई बोरा, सिद्धार्थ गुगळे, रिया गुगळे, सार्थक गुगळे व समीक्षा गुगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी डॉ. संकेत काळपांडे, डॉ. अमेय सांगळे, डॉ. स्वनीत देशपांडे, डॉ. अजित दरंदले, संतोष बोथरा, सतीश लोढा, डॉ.आशिष भंडारी, मानकचंद कटारिया, वसंत चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आयोजक भगवानदास गुगळे यांनी सांगितले की, श्री आनंदऋषी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर हे सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. ग्रामीण व गरजू नागरिकांना योग्य वेळी योग्य उपचार मिळावेत, यासाठी हॉस्पिटल सातत्याने विविध आरोग्य शिबिरे आयोजित करत असते. या माध्यमातून अनेक रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व उपचार मिळत असून त्यांच्या आरोग्याला मोठा दिलासा मिळत आहे. समाजसेवेच्या भावनेतून सुरू केलेले हे कार्य सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोनल गुगळे यांनी सांगितले की, आनंदऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये हजारो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. गरजूंना परवडणाऱ्या दरात तसेच अनेक वेळा मोफत सेवा देण्याचा प्रयत्न येथे केला जातो. त्यामुळे अनेक गरजू रुग्णांसाठी हे हॉस्पिटल हक्काचे ठिकाण आहे. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा संकल्प हॉस्पिटलने केला असून ही सेवा भविष्यातही अखंडितपणे सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अजित दरंदले यांनी मूत्रपिंड, मूत्रमार्ग व मूत्राशयाशी संबंधित आजारांबाबत सविस्तर माहिती दिली. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तसेच पाण्याचे अपुरे सेवन, अयोग्य आहार आणि उन्हामध्ये जास्त फिरणे यामुळे किडनी स्टोनसह अनेक मूत्रविकार वाढताना दिसत आहेत. अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी दररोज पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेषतः उन्हाळ्याच्या काळात शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ नये यासाठी अधिक प्रमाणात पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत. लघवी रोखून ठेवू नये, संतुलित आहार घ्यावा आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी. किडनी स्टोन किंवा मूत्रविकारांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे लघवी करताना त्रास होणे, पाठदुखी, पोटदुखी किंवा लघवीमध्ये जळजळ होणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज अनेक शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित व सोप्या पद्धतीने करता येत असून योग्य वेळी उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.संकेत काळपांडे व डॉ.अमेय सांगळे यांनीही अश्या प्रकारच्या आजार पासून कसे दूर राहता येईल या बदल माहिती दिली.
प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की, आनंदऋषी हॉस्पिटलच्या वतीने वेळोवेळी विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून रुग्णांना उपचाराची संधी दिली जाते. या शिबिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम उपचार मिळतात. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे रुग्णांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच आनंदऋषी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
गुगळे (भातकुडगाव वाला) परिवाराचे आनंदऋषी हॉस्पिटलला नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत असून सामाजिक कार्यात हा परिवार अग्रेसर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले तर आभार सतीश लोढा यांनी मानले. या शिबिरामध्ये एकूण ६० रुग्णांनी तपासणी व उपचाराचा लाभ घेतला. रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व तपासणी करण्यात आली.



