“फटाक्यांऐवजी किल्ले बांधू या!” — संजीवनी संस्थेची अनोखी दिवाळी किल्ला स्पर्धा सुरू

मुंबई | जैनवार्ता

दिवाळीचा सण उजळवताना इतिहासाशी नातं जोडण्याचा आगळावेगळा उपक्रम मुंबईत राबवला जात आहे. संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था, मुंबई यांनी “किल्ला बांधणी स्पर्धा – २०२५” या उपक्रमाची घोषणा केली असून, “फेकला तर दगड, रचला तर किल्ला… चला तर मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडूया!” या घोषवाक्याने या स्पर्धेला ऐतिहासिक सुरुवात झाली आहे.

या उपक्रमाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे वैभव आणि वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. स्पर्धा पूर्णपणे मोफत असून, यात वय अथवा स्थळाची कोणतीही अट नाही.

स्पर्धेचा कालावधी: १२ ते २६ ऑक्टोबर २०२५.

स्पर्धकांनी मातीचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने किल्ला तयार करायचा आहे. प्रत्येक किल्ल्याला स्वतंत्र नाव देणे आवश्यक आहे. तयार किल्ल्यांचे तीन फोटो आणि १ मिनिटाचा व्हिडिओ, स्वतःचे नाव व पत्त्यासह, संस्थेच्या @Sanjeevani.ngo2021 या इंस्टाग्राम पेजवर किंवा ९०२२११३२९४ या क्रमांकावर पाठवायचे आहेत.

निकष: गटकार्य, कल्पकता, किल्ल्याची माहिती आणि सादरीकरणाची सुबकता या आधारे परीक्षक मंडळ विजेते निवडणार आहे.

पारितोषिके:

 प्रथम – ₹१,१११/- + सन्मानचिन्ह

 द्वितीय – ₹७५१/- + सन्मानचिन्ह

 तृतीय – ₹५५१/- + सन्मानचिन्ह

उत्तेजनार्थ स्पर्धकांनाही सन्मानचिन्ह देण्यात येईल. विजेत्या किल्ल्यांचे फोटो आणि व्हिडिओ संस्थेच्या इंस्टा पेजवर प्रसिद्ध केले जातील.

या उपक्रमासाठी गणेश निकम (अध्यक्ष), आनंदराव जाधव (सचिव), मोहन दाबेकर (खजिनदार) आणि अॅड. रविकांत शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यसंघ कार्यरत आहे.

संस्था आवाहन करते —

 “इतिहास जपू या, परंपरा जगवू या; यंदाची दिवाळी किल्ल्यांच्या प्रकाशात उजळू या!”

फटाक्यांच्या आवाजात इतिहास हरवू न देता या दिवाळीत मुलांना आणि तरुणांना मातीशी नाते जोडण्याची आणि इतिहासाशी संवाद साधण्याची अनोखी संधी मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *