जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यंदाची दिवाळी आगळीवेगळी साजरी करत समाजाभिमुख दृष्टिकोनाचा आदर्श ठेवला. कामरगावा जवळील पारधी समाजाच्या पालावर सोमवारी भेट देत त्यांनी मिठाई व साडीचोळींचे वाटप केली. या उपक्रमामुळे पारधी वस्तीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला पोलीस उपाधीक्षक शिरीष वामने, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, तसेच सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले उपस्थित होते. भोसले यांच्या पुढाकारातूनच हा उपक्रम राबविण्यात आला.
भोसले हे राज्यभरातील पारधी वस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम करत आहेत. पारधी समाजातील लोकांवर अन्यायाने होणारे आरोप टाळण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. कामरगाव वस्तीत एक वर्षांपूर्वी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे पाहून पोलीस अधीक्षक घार्गे यांनी समाधान व्यक्त केले व या उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले, पारधी समाजातील मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, महिलांनी व पुरुषांनी रोजगाराच्या संधी स्वीकाराव्यात. समाजातील प्रगती शिक्षण आणि स्वावलंबनातूनच साध्य होते असे त्यांनी सांगितले.
भोसले म्हणाले, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्याला सामाजिक प्रतिष्ठा आणि शासन योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. पारधी समाजावरील चुकीच्या धारणा बदलण्यासाठी आणि त्यांच्या वस्त्यांमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, तसेच या उपक्रमातून पोलीस प्रशासन व समाजातील विश्वास वाढीस लागेल.