अहिल्यानगर | जैनवार्ता
राष्ट्रसंत आचार्य प.पू. आनंदऋषीजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक प.पू. कुंदनऋषीजी म.सा. व संस्कारप्रेरक प.पू. आलोकऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने कार्यरत असलेल्या नवीपेठ येथील आनंद पार्श्व प्री-स्कूलचे ९ वे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात ऋषीजींच्या पावन नवकार मंत्र जपाने करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी निर्मल बाफना, मेघा बोरा, इच्छाबाई बोरा, लताबाई बोरा, सुप्रिया छल्लाणी, सुशीला बाफना, प्रभावती मुथा, अशोक पगारिया, मनोज शेटिया, मनोज बाफना, संजय चोपडा, सचिन बोरा, मोहन बरमेचा तसेच आनंद पार्श्व प्री-स्कूलच्या प्राचार्य ज्योती पुरी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान असलेले ट्रस्टी स्व. रमेशचंद्र बाफना यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य ज्योती पुरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिमय व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वागत गीत, ‘माय भवानी’, ‘की जो केसरी के लाल’ तसेच ‘अच्युतम केशवम’ या गीतांवरील नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
मागील दोन वर्षांपासून शाळेच्या अभ्यासक्रमात भगवद्गीता पारायणाचा समावेश करण्यात आला असून, त्याची मौखिक परीक्षाही घेतली जाते. यावेळी विद्यार्थ्यांनी भगवद्गीता पारायणाचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांकडून भरभरून दाद मिळवली व ‘वन्स मोअर’चा मान मिळवला.
प्रमुख पाहुण्यांनी शाळेत दिल्या जाणाऱ्या संस्कारक्षम शिक्षणाचे तसेच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. शाळेच्या को-ऑर्डिनेटर मेघा बोरा या प्रत्येक कार्यक्रम व उपक्रमासाठी उत्साहाने योगदान देत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य ज्योती पुरी यांच्यासह शिक्षिका रेखा जेटला, नूतन पितळे, श्रद्धा पारेख व तरुणा ढवळे यांनी विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घेतली. कार्यक्रमाची सांगता प्रमुख पाहुणे अशोक पगारिया यांच्या प्रेरणादायी भाषणाने व आभार प्रदर्शनाने करण्यात आली.



