संस्कार आणि संस्कृतीचा संगम; आनंद पार्श्व गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अहिल्यानगर | प्रतिनिधी

येथील प्रख्यात आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुल शाळेचे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषिजी म.सा., महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा. तसेच संस्कार दिवाकर पूज्य आलोकऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वाद व प्रेरणेमुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला.

गुरुकुल परंपरेतील आधुनिक शिक्षणपद्धतीचे दर्शन घडवत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. ‘शिक्षा, सेवा, संस्कार आणि संस्कृती’ या मूल्यांचा सुंदर आविष्कार विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांतून साकार केला. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना ‘संस्कार आणि आध्यात्मिक महत्त्व’ अशी असून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती व परंपरांची रुजवण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पूज्य संत व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तसेच विद्यार्थ्यांच्या सामूहिक नवकार मंत्र व गणेश वंदनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व नाट्यकलेचे सादरीकरण केले. लोकनृत्ये, देशभक्तीपर गीते आणि नैतिक मूल्यांवर आधारित लघुनाट्यांमधून जीवनातील मूल्ये व ध्येयाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले.

या कार्यक्रमास ट्रस्टचे कार्याध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, आनंद भंडारी (I.A.S.) व सुप्रसिद्ध उद्योजक आनंदराज मुनोत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह निर्मला बाफना, मेघा बोरा, इच्छाबाई बोरा, लताबाई बोरा, सुप्रिया छल्लानी, सुशीला बाफना, मोहन बरमेचा, राजकुमार लूनिया, मनोज बाफना, मनोज शेटिया, राजेंद्र बोरा, मधुबाला चोरडिया, आनंद चोपड़ा आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. आजच्या डिजिटल युगात गुरुकुल परंपरेशी विद्यार्थ्यांना जोडून ठेवणारे श्री आनंद पार्श्व गुरुकुलचे कार्य अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. शैक्षणिक वर्षभरात विविध स्पर्धा व अभ्यासात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

शाळेच्या प्राचार्या कादंबरी सूर्यवंशी यांनी मागील वर्षाचा प्रगती अहवाल सादर करून आगामी उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले, तर समन्वयक मेघा बोरा यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांच्या सहकार्यामुळे हा स्नेहसंमेलन सोहळा अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचा समारोप मनोज शेटिया यांनी आभारप्रदर्शन व पसायदानाने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *