अहिल्यानगर | प्रतिनिधी
उत्तर युरोपातील एस्टोनिया येथे आयोजित प्रतिष्ठेच्या जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत अहिल्यानगरच्या दिया प्रीतम छाजेड व इशिका अभिजीत अडसूळ या दोन भारतीय विद्यार्थिनींनी जागतिक विक्रम प्रस्थापित करत देशाचे नाव उज्ज्वल केले. जगातील ७० देशांतील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागे टाकत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या दैदीप्यमान यशाबद्दल माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दोघींनाही कौतुकाची थाप देत अभिनंदन केले.
एस्टोनिया येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये यंदा दिया छाजेड व इशिका अडसूळ यांनी सर्व फेऱ्या यशस्वीरीत्या पार करत जगात ‘नंबर वन’ होण्याचा मान मिळवला. त्यांनी मोबाईलवर ऑपरेट होणारा, शेतीसाठी उपयुक्त असा अभिनव रोबोट तयार केला होता. ७० प्रगत देशांतील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागातून मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांनी केलेल्या कौतुकाने आम्ही भारावून गेलो असल्याची भावना दिया छाजेड व इशिका अडसूळ यांनी व्यक्त केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अहिल्यानगरसह देशाच्या रोबोटिक्स व तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या पिढीसाठी प्रेरणा निर्माण झाली आहे.



