इरादा पक्का, हौसला बुलंद आणि मेहनतीची तयारी असेल तर प्रत्येक ध्येय साध्य करता येते : सीए डॉ. अशोककुमारजी पगारिया

अहिल्यानगर | प्रतिनिधी

आनंदधाम येथे दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या सकल जैन समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रसंत आचार्य भगवंत प पू श्री आनंदऋषीजी म सा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदनऋषीजी म सा आणि प्रबुद्ध विचारक श्री आदर्शऋषीजी म सा यांच्या प्रेरणेने वीर सेना व श्री तिलोकरत्न जैन स्थानकवासी परीक्षा बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री आलोकऋषीजी म सा 

 यांनी मंगलाचरण, नवकार मंत्र जप व आनंदधूनचे पठण केले. कुमारी दिया गांधी यांनी प्रमुख वक्ते सीए डॉ. अशोककुमारजी पगारिया यांचा परिचय करून देत उपस्थितांचे स्वागत केले.

करिअर मार्गदर्शन करताना सीए डॉ. अशोककुमारजी पगारिया म्हणाले की, मनात ठरवलेले कोणतेही करिअर कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर निश्चित साध्य करता येते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या आणि रुचीच्या क्षेत्राची निवड करावी. ज्या क्षेत्रात आवड असेल, त्या क्षेत्रात अभ्यास मनापासून होत असल्याने यश मिळण्याची शक्यता अधिक असते.

त्यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर लॉ, वकिली, पायलट आदी क्षेत्रांतील संधींची माहिती दिली. तसेच वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सीए, सीएस, कॉस्ट अकाउंटंट, एमबीए, सीएफए, एलएलबी, फॉरेन्सिक अकाउंटिंग व ऑडिटिंग यांसारख्या करिअर पर्यायांची माहिती दिली. कला शाखेतील विद्यार्थ्यांना बी.ए., एम.ए., एलएलबी तसेच यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासकीय सेवेत जाण्याच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशी भाषा अभ्यासक्रम, पायलट, एअर होस्टेस, चित्रपट अभिनेता व दिग्दर्शक यांसारख्या क्षेत्रांमध्येही मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना म्हटले की, “तुम्ही कोणतेही करिअर निवडा, ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि बुलंद हौसला आवश्यक आहे.”

याप्रसंगी त्यांनी प्रसिद्ध शायरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले –

“मंजिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है,

उड़ान केवल पंखों से नहीं दोस्तों,

हौसलों से होती है.”

मार्गदर्शनानंतर श्री आलोकऋषीजी म सा यांनी युवा वर्गाला संस्कार, संघटन आणि सेवा या तीन गोष्टी जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. ते म्हणाले,

“जहाँ संघटन होता है, वहाँ शक्ति होती है,

जहाँ सेवा होती है, वहाँ श्रद्धा होती है,

और जहाँ धर्म होता है, वहाँ मानवता का कल्याण होता है.”

कार्यक्रमात सीए डॉ. अशोककुमार पगारिया, पत्रकार पंकज गुंदेचा, श्री सचिन डागा व श्री दीपक कासवा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री रतिलाल कटारिया, श्री संतोष गांधी, श्री मदन मुनोत, सौ. लता बोरा, सौ. मनीषा मुनोत, सौ. सुशिला बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.

दहावी व बारावी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच ‘जैन विश्व’ या संकेतस्थळाचे आणि ‘वीर सेना’च्या नवीन लोगोचे विमोचन महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य श्री कुंदनऋषीजी महाराज यांच्या सान्निध्यात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यश चोरडिया, अथर्व पिपाडा, रिया गांधी, दिया गांधी, अंकुश चव्हाण, स्वराज गांधी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *