मुंबई | प्रतिनिधी
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या बेकायदेशीर व साम्राज्यवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. केंद्रातील भाजपा सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताचे हित धोक्यात येत असल्याचा आरोप करत भाकपने या आंदोलनाची घोषणा केली आहे.
पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अॅड. सुभाष लांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जागतिक तेल संपत्तीवर ताबा मिळवणे आणि डॉलरचे वर्चस्व कायम ठेवणे हा या युद्धामागील अमेरिका-इस्रायलचा कुटिल हेतू आहे. इराण हा भारताचा ऐतिहासिक मित्र देश असतानाही केंद्र सरकार अमेरिकेच्या दबावाखाली चाबहार बंदर आणि ऊर्जा करिडोरसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सोडून देत आहे.
या युद्धामुळे आखाती देशांत राहणाऱ्या सुमारे ९५ लाख भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १५ डॉलरची वाढ झाली असून रुपया घसरून ९१.४५ वर पोहोचला आहे. याचा थेट परिणाम महागाईवर होत आहे. तसेच निर्यात ठप्प झाल्याने बासमती तांदूळ, साखर, कांदा आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर संकट निर्माण झाले आहे. या नुकसानीची ५० हजार कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही पक्षाने केली आहे.
या साम्राज्यवादी आक्रमणाला विरोध करण्यासाठी आणि देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी ९ मार्च रोजी होणाऱ्या आंदोलनात शेतकरी, कामगार आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ. सुभाष लांडे यांनी केले आहे.
चौकट : केंद्र सरकारकडे प्रमुख मागण्या
१) इराणवरील हल्ल्याचा संसदेत निषेध ठराव संमत करून संयुक्त राष्ट्रात आवाज उठवावा.
२) I2U2 आणि QUAD सारख्या लष्करी युतींतून भारताने तत्काळ बाहेर पडावे.
३) भारताचा कोणताही भूप्रदेश किंवा बंदरे इराणवर हल्ला करण्यासाठी वापरू देणार नाही, याची हमी द्यावी.
४) रशियाकडून सवलतीच्या दरात तेल आयात करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत.



