साधु-संतांच्या सानिध्यात गुढीपाडवा; आनंदधाम येथे नववर्ष मंगलमय प्रारंभ

अहिल्यानगर | प्रतिनिधी

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नववर्षाच्या स्वागताचा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराच्या प्रारंभाचा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वसंत ऋतूच्या आल्हाददायक वातावरणात नवचैतन्य आणि आनंदाचा दुग्ध-शर्करा योग अनुभवायला मिळतो.

याच पार्श्वभूमीवर आनंदधामच्या पवित्र प्रांगणात साधु-संतांच्या पावन सानिध्यात नववर्षाची सुरुवात करण्याची सुवर्णसंधी भाविकांना मिळणार आहे. राष्ट्रसंत आचार्य सम्राट प.पू. श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्या पावन भूमीत, आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक पू. श्री कुंदनऋषिजी म.सा., प्रबुद्ध विचारक पू. श्री आदर्शऋषिजी म.सा. तसेच अन्य साधु-साध्वीजी महाराजांच्या उपस्थितीत विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, 19 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत आदिनाथ भगवान स्तुतीरूप श्री भक्तामर स्तोत्र व इतर मंगल स्तोत्रांचे पठन, तसेच मंगल आशीर्वचन होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता नववर्ष मंगलपाठ आयोजित करण्यात आला आहे.

या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री वर्धमान स्था. जैन श्रावक संघ आणि श्री तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *