अहिल्यानगर | प्रतिनिधी
देशभरात आकाशवाणीच्या स्थापनेला नव्वद वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “आकाशवाणी @ 90” हा विशेष उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि युवान, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध लेखन स्पर्धा रविवारी अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडली.
जैन बोर्डिंग, अहिल्यानगर येथील युवान वसतिगृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “आकाशवाणीचे बदलते स्वरूप”, “राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका”, “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि युवकांसमोरची आव्हाने”, तसेच “समाजमाध्यमे आणि युवक” अशा विविध समकालीन विषयांवर स्पर्धकांनी आपले विचार लेखनाच्या माध्यमातून मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांनी आकाशवाणीचे विविध कार्यक्रम तसेच “आकाशवाणी @ 90” या उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. युवानचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी आधुनिक काळात आकाशवाणी सारख्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे युवकांना मिळणाऱ्या संधी व त्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील उत्कृष्ट निबंधांची निवड परीक्षकांकडून करण्यात आली. यामध्ये अक्षता दत्तात्रय वडवणीकर हिने प्रथम क्रमांक, आरती ज्ञानदेव आरगडे हिने द्वितीय, सुरज सुरेश चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकावला. तर गौरी रविंद्र लहामगे आणि मंगेश दत्तात्रय गुंजाळ यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
या उपक्रमाबाबत सहभागी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आकाशवाणीशी अधिक जोडले जाण्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल सातपुते, वृषाली घनवट, मीना जाधव, श्रेयस लहामगे, चेतन औटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.



