समता शिरोमणी उपाधीने प पू श्री कुंदनऋषिजी म.सा. यांचा गौरव; आनंदधाम येथे ६५वा दीक्षादिन महोत्सव उत्साहात

अहिल्यानगर | प्रतिनिधी

राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी म सा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आनंदधाम येथे आचार्य भगवंतांचे ज्येष्ठ सुशिष्य, मौनसाधक महाश्रमण प पू श्री कुंदनऋषिजी म सा यांचा ६५वा दीक्षादिन महोत्सव चतुर्विध संघाच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांना “समता शिरोमणी” या उपाधीने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरण, नवकार महामंत्र जाप आणि आनंद धूनने झाली. साध्वी श्री सुजिज्ञाजी म सा व श्री विनितदर्शनाजी म सा यांनी सुंदर भजनांद्वारे प्रवर्तकश्रींच्या संयमी जीवनाचे गुणगान केले.

यानंतर साध्वी श्री दिव्ययशाजी म सा, श्री अर्चनाजी म सा व श्री सत्यप्रभाजी म सा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रवर्तकश्रीजींनी आनंदगुरूंच्या चरणी समर्पित होऊन संयमी जीवन सार्थक केले आहे. सेवा, समता, सहजता, मधुरता, समर्पणता आणि सहनशीलता या गुणसंपदेमुळे गुरुदेव पूजनीय बनले असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रबुद्ध विचारक श्री आदर्शऋषिजी म सा यांनी प्रवर्तकश्रीजींच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आचार्य प पू श्री आनंदऋषिजी म.सा. यांच्याप्रती त्यांची निष्ठा व सेवा अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. ९२व्या वर्षीही त्यांची स्थिरता व देहाप्रती अनासक्त भाव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्कार दिवाकर श्री आलोकऋषिजी म सा यांनी सूत्रसंचालन करत गुरुंबद्दल श्रद्धा व आत्मीयता व्यक्त केली.

श्रावक संघातर्फे श्री संतोषजी गांधी यांनी दीक्षादिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीमती सक्करबाई मेहेर, मनीषाजी मुनोत व देशना चुत्तर यांनीही प्रवर्तक गुरुदेवांना शुभेच्छा अर्पण केल्या.

पूज्य गुरुदेवांचे जीवन समता, सहनशीलता आणि धैर्य या गुणांनी ओतप्रोत भरलेले असून, कोणत्याही परिस्थितीत न डगमगता ते शांत व गंभीर राहतात. आबालवृद्ध, गरीब-श्रीमंत सर्वांशी आपुलकीने वागणे ही त्यांची विशेषता असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी आनंद कुलच्या सर्व साधू-साध्वींच्या वतीने महाराष्ट्र प्रवर्तक पू. श्री कुंदनऋषिजी म.सा. यांना आदराची चादर अर्पण करून “समता शिरोमणी” या उपाधीने अलंकृत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर शहरासह विविध भागांतून हजारो श्रावक-श्राविका उपस्थित होते. त्यांनी पूज्य गुरुदेवांच्या दीर्घ संयमी जीवनाची अनुमोदना केली.

दरम्यान, १० मे रोजी साध्वी रत्ना श्री सुमनकंवरजी म सा यांचा स्मृतिदिन जाप व गुरुगुणगान कार्यक्रम सकाळी ९ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. तसेच १३ मे रोजी पिंपळगाव बसवंत येथील सुश्राविका श्रीमती विजयाबाईजी कोचर यांची जैन भागवती दीक्षा सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री वर्धमान स्था. जैन श्रावक संघ व श्री तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *