अहिल्यानगर | प्रतिनिधी
मानवी जीवनातील शाश्वत सुखाचा मार्ग हा भोगोपभोगात नसून त्याग आणि संयमात दडलेला असल्याचे जैन धर्मात सांगितले जाते. सद्गुरूंच्या सानिध्यातून वैराग्याची जाणीव झाल्यानंतर अनेक जण संयम साधनेचा मार्ग स्वीकारतात. भगवान महावीर स्वामी यांनी सांगितलेल्या अहिंसा, सत्य आदी पाच महाव्रतांचे पालन करत संसाराचा त्याग करून मोक्षप्राप्तीकडे वाटचाल करण्यासाठी जैन भागवती दीक्षेला विशेष महत्त्व आहे.
पिंपळगाव बसवंत येथील श्रीमती विजया प्रकाशचंदजी कोचर यांनी संसाराची असारता आणि जीवनाची नश्वरता ओळखून वयाच्या ६५ व्या वर्षी संयम व त्यागाचा मार्ग स्वीकारण्याचा दृढ निश्चय केला आहे. आनंदधामच्या पवित्र वातावरणात महाराष्ट्र अभिषेक प पू श्री कुंदनऋषिजी म सा, प्रबुद्ध विचारक श्री आदर्शऋषिजी म सा तसेच साधू-साध्वीजींच्या पावन सानिध्यात उपप्रवर्तिनी अरिहंत आराधिका श्री कंचनकवरजी म सा यांच्या निश्रायामध्ये बुधवार, १३ मे २०२६ रोजी विजया कोचर यांचा दीक्षा सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात सकाळी ९.३० वाजता प्रवचन व दीक्षा विधीला प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यास सर्व श्रावक-श्राविकांनी उपस्थित राहून संयम अनुमोदनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वर्धमान स्था. जैन श्रावक संघ व श्री तिलोकरत्न जैन धार्मिक परीक्षा बोर्ड, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



